बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख आघाडय़ांची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. संयुक्त जनता दल-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत प्रामुख्याने राजद भाजपविरोधात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-जनता दल एकत्र होते. त्यामध्ये पूर्वी जिंकलेल्या जागा जनता दल आपल्याकडे राखणार आहे. त्यामुळे भाजपच्या प्रभावक्षेत्रात राजदला सामना करावा लागेल असे सुत्रांनी स्पष्ट केले. २०१० मध्ये जनता दलाने ११२ जागा तर भाजपने ९४ ठिकाणी विजय मिळवला होता. दरम्यान या वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजप ५५ ते ७० जागा मित्रपक्षांना सोडणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष, उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष तसेच माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा यांच्यासाठी या जागा दिल्या जातील.
नितीश-लालू यांची युती पुन्हा राज्यात जंगलराज आणेल या मुद्दय़ावर भाजप भर देईल असे पक्षाने स्पष्ट केले आहे. लालूप्रसाद यांच्या पाठीशी मोठय़ा प्रमाणात यादव-मुस्लीम मतदार असल्याची चिंता भाजपला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाने त्यांचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करावे अशी मागणी केली आहे. पक्षाच्या वैशाली येथे झालेल्या बैठकीत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला.

‘आप’चा प्रचार?
भाजपविरोधात संघर्ष सुरू असल्याने आम आदमी पक्ष बिहारमध्ये भाजपविरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे. पक्ष थेट रिंगणात उतरणार नाही, मात्र नितीशकुमार यांना मदत करेल असे आपच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले.