पाटणा : करोना आणि टाळेबंदीमुळे झालेल्या विनाशाबद्दल सत्तारूढ पक्ष उत्सव साजरा करीत असल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ राजदचे नेते आणि कार्यकर्त्यांनी रविवारी येथे थाळीनाद आणि शंखनाद केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दूरचित्रसंवादापूर्वी ही निदर्शने करण्यात आली.

बिहारसह देशात करोनामुळे विध्वंस झाला असतानाही गृहमंत्री डिजिटल मेळावा घेत असल्याबद्दल या वेळी टीका करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे सरकार स्थलांतरित कामगारांना दुय्यम नागरिकांसारखी वागणूक देत असल्याचा आरोपही विरोधी पक्षाने केला.

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या १०, सक्र्युलर मार्ग निवासस्थानाबाहेर मोठा जमाव जमला होता. या वेळी राबडीदेवी यांनी पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक अंतर राखून थाळीनाद केला. निदर्शनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्याच्या विविध भागांमध्ये थाळीनाद आणि शंखनाद करण्यात आला.

करोना आणि टाळेबंदीमुळे झालेल्या विनाशाबद्दल सत्तारूढ पक्ष उत्सव साजरा करीत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. तथापि, विरोधी पक्षाचे समर्थक आणि पोलीस यांच्यात राज्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.