देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस प्रकरणाची धग अजूनही कमी झालेली नाही. सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांसह विविध संघटनांचे पदाधिकारी करत आहेत. मात्र, उत्तर प्रदेश सरकार भेट घेण्यास मज्जाव करत असल्याचं चित्र आहे. रविवारी राजदचे नेते जयंत चौधरी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना चौधरी यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. या पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील वातावरण तापलं आहे. राजकीय नेते पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते जयंत चौधरी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना अचानक उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यामुळे घटनास्थळी मोठी धावपळ उडाली.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला. प्रियंका गांधी यांनी ट्विट करत योगी सरकारला लोकशाही देश असल्याची आठवण करून दिली आहे. “राष्ट्रीय जनता दलाचे नेते जयंत चौधरी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेला दुर्व्यवहार निंदनीय आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या प्रकारे हिंसा? हे उत्तर प्रदेश सरकारच्या अंहकाराचं आणि सरकार अराजक झाल्याचे संकेत आहेत. कदाचित ते विसरून गेले आहेत की, आपला देश एक लोकशाही देश आहे. जनता त्यांना याची आठवण करून देईल,” असं म्हणत प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतानाही पोलिसांनी रोखलं होतं. त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार केला होता. उत्तर प्रदेश सरकारकडून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यापासून रोखलं जात असल्याचं चित्र दिसत आहे.