पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात तोडू असे बेताल विधान करणाऱ्या बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांच्यावर राबडीदेवी यांनी पलटवार केला आहे. हिंमत असेल तर तुम्ही हात तोडून दाखवाच, बिहारमध्ये नरेंद्र मोदींचे हात तोडणारे अनेकजण आहेत, अशा शब्दात राबडीदेवी यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र राबडीदेवी यांच्या विधानानेही वाद निर्माण झाला आहे.

पाटणा येथे सोमवारी एका मेळाव्यात बिहारमधील भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार नित्यानंद राय यांनी वादग्रस्त विधान केले होते. नरेंद्र मोदी हे गरीब कुटुंबातून पुढे आले आहेत, अनेक अडथळ्यांवर मात करत ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. त्याचा आपण सर्वांना अभिमान असायला हवा, त्यांच्याकडे बोट दाखवणाऱ्यांचे आपण सर्वांनी मिळून हात तोडले पाहिजे असे विधान त्यांनी केले होती. वाद निर्माण होताच त्यांनी विधान मागे घेतले होते. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी वाक् प्रचाराचा वापर केला. ते वक्तव्य शब्दश: घेऊ नये, अशी सारवासारव त्यांनी केली होती.

नित्यानंद राय यांच्या विधानावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री व लालूप्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवींनी प्रतिक्रिया दिली. मात्र, या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला. राबडीदेवी म्हणाल्या, नित्यानंद राय म्हणतात की मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात तोडणार. हिंमत असेल तर त्यांनी हात तोडून दाखवावेच. बिहारमध्ये नरेंद्र मोदींचाही हात तोडणारे अनेकजण आहेत.

नरेंद्र मोदींवर वादग्रस्त टीका केल्यानंतर राबडीदेवींनी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला आव्हान दिले. तपास यंत्रणांना माझी चौकशी करायची असेल त्यांनी घरी येऊन चौकशी करावी. सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची  वृत्ती व चरित्र मला माहित आहे. मी काही गुन्हा केलाच नाही तर मी त्यांना का घाबरु असा सवाल त्यांनी विचारला.