बिहार विधानसभेत नितीशकुमारांवर तिखट शब्दात टीका करणाऱ्या तेजस्वी यादव यांनी आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी  भाजपविरोधात सगळ्या विरोधी पक्षांची मोट बांधावी आणि सगळ्या पक्षांना भाजपविरोधात ताकदीनं उभं करावं. राहुल गांधी यांच्यात ती क्षमता आहे, सगळ्यांनाच ते एकाच मंचावर घेऊन आले तर भाजपला टक्कर देणं शक्य आहे, याबाबत त्यांनी गांभीर्यानं विचार करावा असा सल्ला तेजस्वी यादव यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे.

राहुल गांधी हे एक जबाबदार राजकारणी आहेत त्यांनी भाजपला टक्कर देण्याचं आव्हान स्वीकारलं पाहिजे, याबाबत माझी आणि त्यांची चर्चा झाली आहे असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. बिहारचं उपमुख्यमंत्रीपद गेल्यावर आता तेजस्वी यादव यांना कंठ फुटला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात तेजस्वी यादव यांनी थेट राहुल गांधींनाच सल्ला दिला आहे. तेजस्वी यादव हे सत्तेत होते तोवर त्यांच्या भाषणाला शब्दांची धार नव्हती किंवा आक्रमकता दिसून आली नव्हती. आता मात्र तेजस्वी यादव यांची आक्रमकता वाढल्याचं दिसून येतं आहे. तेजस्वी यादव यांच्यात झालेला हा बदल राजकीयदृष्ट्या चांगला आहे मात्र हा बदल त्यांना कायमस्वरूपी टिकवून ठेवावा लागेल.

काही राजकीय जाणकार तेजस्वी यादव यांनी दिलेलं भाषण आणि राहुल गांधी उपाध्यक्ष झाल्यावर यांची तुलना करत आहेत. २० जानेवारी २०१३ ला जेव्हा राहुल गांधी यांनी काँग्रेसचं उपाध्यक्षपद स्वीकारलं तेव्हा एक आक्रमक भाषण केलं होतं. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेत होता. आता तेजस्वी यादव यांनी दिलेल्या भाषणाचीही चर्चा होते आहे मात्र हे भाषण सत्ता गेल्यावर दिलं आहे. हा दोन्ही भाषणांमधला मूलभूत फरक आहे.

ज्या आक्रमकतेनं त्यांन नितीशकुमारांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे त्यामुळे बिहारचं राजकारण ढवळून निघालं आहे. राजदकडे ८० आमदारांचं पाठबळ होतं म्हणून मला कोणीही हटवू शकलं नाही, तेजस्वी यादव यांनी सत्ता गेल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात लोकांची मनं जिंकल्याचं समोर आलं आहे. आता राहुल गांधी त्यांनी दिलेला सल्ला ऐकून सगळ्या विरोधकांची मोट बांधणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.