राष्ट्रीय जनता दलाचे प्रमूख लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आणि बिहारमधील दानापूरचे नगरसेवक केदार राय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवर आलेल्या गुंडांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या केदार राय यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यांनी त्वरीत एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. केदार राय यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. केदार राय यांच्या हत्येमुळे दानापूर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

‘न्यूज १८’ ने दानापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी रंजीतकुमार यांच्या हवाल्याने याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. प्रेमरतन सिंह, राजरतन सिंह आणि प्रशांत किशोर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्याचबरोबर इतर १८ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.