बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू, राजद आणि कॉंग्रेस यांच्या महाआघाडीने मिळवलेल्या विजयातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी धडा घेतला आहे. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडी शक्य आहे, असे अखिलेश यांनी रविवारी सांगितले.
भाजपला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी होऊ शकते, असे उत्तर प्रदेशचे मंत्री फरीद महफूज किडवाई यांनी शनिवारी म्हटले होते.
या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी महाआघाडीबाबत विचारले असता, अखिलेश यादव यांनी ही शक्यता वर्तवली. मात्र, या महाआघाडीबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.
बिहारच्या जनतेने विकासाला कौल दिला आहे. उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीतही जनतेने सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या विकासाला मत दिले आहे. राज्यातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकाही विकासाच्या मुद्यावर लढवणार असल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशातही भाजपने मुसंडी मारली होती. यामुळे राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या या राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याची आशा भाजपला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 12:53 am