आपल्या सहकारी महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले पर्यावरणतज्ज्ञ आर.के. पचौरी यांनी ‘इतर आवडीची कामे करण्यासाठी’ ‘टेरी’च्या नियामक परिषदेचे सदस्यपद सोडले आहे.
पचौरी यांच्या ‘टेरी’तील नोकरीचे कंत्राट २०१७ साली संपत असले, तरी या संस्थेने पचौरी यांच्यासोबतचे संबंध तोडण्याचे ठरवले असल्याचे वृत्त एका प्रसारमाध्यमाने प्रसिद्ध केले असतानाच पचौरी यांनी पदत्यागाची घोषणा केली आहे.
नियामक परिषदेने पचौरी यांच्या उर्वरित कार्यकाळाचा संपूर्ण पगार देण्याचा निर्णय घेऊन त्यांची नोकरी संपवण्याचे ठरवले आहे.
दि एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूट (टेरी) चे सदस्य म्हणून आपली मुदत ३१ मार्च २०१६ ला संपली आहे. आता येथून दूर होऊन गेली अनेक वर्षे मी मनात जपलेल्या इतर आवडी जोपासून जागतिक स्तरावर काम करण्याची वेळ आली असल्याचे मला वाटते, असे कारण पचौरी यांनी दिले आहे.
या संदर्भात संपर्क साधला असता ‘टेरी’च्या प्रवक्त्याने सांगितले, की ‘टेरी’च्या नियामक परिषदेची बैठक १८ मार्चला होऊन तीत अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीच्या कार्यवृत्ताला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.