ब्रिटनमधील बाथ विद्यापीठातील संशोधन
हेल्मेट परिधान करण्याच्या सवयीमुळे तुमच्यात टोकाची जोखीम घेण्याची, सनसनाटी काहीतरी करण्याची वृत्ती बळावते त्यामुळे तुम्हाला अपघातही होऊ शकतात, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. या संशोधनाचा सोपा अर्थ म्हणजे हेल्मेटधारी व्यक्तींना हेल्मेट घातल्यानंतर आता आपण कितीही वेगात जायला हरकत नाही, कुठलीही जोखीम पत्करायला हरकत नाही, असे वाटते व त्यांची तशी मानसिकता बनते परिणामी हेल्मेटने संरक्षण होणार नाही, असे धोकेही ते पत्करतात.
ब्रिटनमधील बाथ विद्यापीठातील संशोधकांनी हेल्मेटधारी असलेल्या १७ ते ५६ वयोगाटील व्यक्तींचा संगणकीय सादृश्यीकरणाच्या मदतीने अभ्यास केला. एकूण ८० सहभागी व्यक्तींना दोन गटात विभागण्यात आले. त्यातील एका गटाला सायकलीवर घालण्याचे अर्धे हेल्मेट देण्यात आले तर एका गटाला बेसबॉलची टोपी देण्यात आली. त्यात असे दिसून आले, की हेल्मेटधारी व्यक्ती जास्त जोखीम घेतात.
याचा अर्थ प्रत्यक्ष आयुष्यात हेल्मेटधारी व्यक्ती त्यांच्या हेल्मेटने संरक्षण न होणारी कृत्ये करण्याची जोखीम घेतात, असे दिसून आले आहे, त्यात हेल्मेटचा काही उपयोग होत नाही. ‘सायकॉलॉजिकल सायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.