हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील गोहाना येथे दरोडेखोरांनी चक्क १२५ फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्टाँगरुममध्ये प्रवेश मिळवत कोट्यावधीच्या रोख रकेमवर डल्ला मारला.
या ‘फिल्मी स्टाईल’ दरोडयाने राज्यातील पोलीस यंत्रणाही हादरून गेली आहे. बँकेवर अशाप्रकारे दरोडा पडल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असली तरी दरोडेखोरांनी शनिवारी रात्रीपासून भुयार खोदण्यास सुरूवात केली असल्याचा पोलिसांचा कयास आहे. गोहानातील जुन्या बसस्थानकाजवळील पंजाब नॅशनल बँकेला लागून असलेल्या इमारतीतून चोरट्यांनी २.५ फूट रुंदीचा भुयारी मार्ग खोदला होता. चोरट्यांनी या इमारतीतील दोन खोल्यांमध्ये भुयारातील माती टाकली. खोलीच्या खिडक्या झाकण्यात आल्यामुळे आत काय सुरू आहे याचा अंदाज कोणाला आला नाही. या दरोड्यासाठी चोरट्यांनी बँकेच्या रचनेची पूर्ण माहिती काढून बऱयाच काळापासून नियोजन केले असावे, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. लुटीची नेमकी रक्कम अद्याप कळू शकलेली नाही तरी, चोरट्यांनी एकूण ९० लॉकर्स फोडल्याची माहिती बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. त्यानुसार चोरीची रक्कम कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासूनचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले आहे.