ग्रामप्रधानासह काही व्यक्तींच्या गटाने शामली जिल्हय़ातील कैराना शहरात चित्रपटगृहाच्या कार्यालयात घुसून मालकाला बंदुकीचा धाक दाखवत रक्कम लुटली. जिवास धोका कायम राहिला तर या भागातून स्थलांतर करू, असे चित्रपटगृहाच्या मालकांनी सांगितले. पोलिसांनी भुरा खेडय़ाचे ग्रामप्रधान यांचा नातेवाईक कमरान याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात कमरान याला अटक करण्यात आली असून, बाकीचे अजून फरार आहेत असे पोलीस अधिकारी ए. पी. भारद्वाज यांनी सांगितले. कैराना पोलीस स्टेशनला दाखल तक्रारीत म्हटले आहे, की कमरान याने काल रामा पॅलेस येथे चित्रपटगृहाच्या कार्यालयात घुसून मालक प्रदीप मित्तल यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली व पाच हजार रुपये लुटले. मित्तल यांनी सांगितले, की कायदा व सुव्यवस्थेत फरक पडला नाही तर नाइलाजाने स्थलांतर करावे लागेल. भाजपचे खासदार हुकूम सिंग यांनी असा दावा केला होता, की मुझफ्फरनगरमधील २०१३च्या दंगलीत फटका बसलेल्या कैराना येथून हिंदूंना कायदा व सुव्यवस्था नसल्याने स्थलांतरित व्हावे लागत आहे.

*************

‘शहा यांचे वक्तव्य भाजपची चिंता स्पष्ट करणारे’

लखनौ: उत्तर प्रदेशच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अमित शहा यांनी चिंता व्यक्त केली असली तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे घटनात्मक कर्तव्य केंद्र सरकारला पार पाडता आले नाही अशी टीका बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे.

भाजप चिंताग्रस्त असल्यामुळेच अमित शहा पोरकट विधाने करत आहेत.  काही गरज नसताना ते उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा वारंवार उपस्थित करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. बहुजन समाज पक्षातील नेते पक्षातून बाहेर पडू लागल्यामुळे निवडणुकीच्या वेळी मायावती एकटय़ाच पक्षात राहतील, असेही विधान शहा यांनी केले होते.