रॉबर्ट म्यूलर अहवाल जाहीर; थेट ठपका नाही, मात्र संशय कायम

वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न रशियाने केला. मात्र, डोनाल्ड ट्रम यांच्या प्रचारकांनी रशियाशी संगनमत केल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचे रॉबर्ट म्यूलर यांच्या अहवालात म्हटल्याचे अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरल विल्यम बार यांनी गुरुवारी सांगितले. यामुळे ट्रम्प यांना दिलासा मिळाला असला तरी, याबाबत संशय मात्र कायम आहे.

रशिया आणि ट्रम्प प्रचारकांमध्ये कथित संगनमताबाबत जवळपास २२ महिन्यांच्या तपासानंतर रॉबर्ट म्यूलर यांनी अहवाल तयार केला आहे. रॉबर्ट यांचा हा संपूर्ण  अहवाल अमेरिकी कॉंग्रेसमध्ये सादर करण्यात येणार असून, विल्यम बार यांनी त्यातील संक्षिप्त भाग गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेपाचा प्रयत्न केला. मात्र, त्यास डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांच्या प्रचारकांनी कोणतीही दाद दिली नाही. ट्रम्प प्रचारक आणि रशिया यांच्यात सहकार्य, संगनमत असल्याचे आढळलेले नसल्याचे म्यूलर अहवालात नमूद केल्याचे विल्यम यांनी सांगितले.

म्युलर यांनी ट्रम्प यांचे प्रचार अधिकारी आणि रशियन सरकारशी संबंधित व्यक्ती यांच्यातील अनेक दुवे आणि संपर्क यांचा तपास केला. या संपर्काची पडताळणी केल्यानंतर, रशियाशी संबंध असलेल्या किंवा ट्रम्प यांच्या प्रचाराशी संबंधित व्यक्तींच्या मदतीने अमेरिकेच्या कायद्याचा भंग करण्याचे कुठलेही कारस्थान म्युलर यांना आढळले नाही, असे बार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, मूल्यर यांच्या तपासात आडकाठी आणण्याचा ट्रम्प यांनी प्रयत्न केल्याचे सूतोवाच या अहवालात आहेत.

डेमोक्रॅटिक पक्ष असमाधानी..

अध्यक्षीय निवडणुकीतील रशिया आणि ट्रम्प प्रचारक यांच्यातील संगनमताबाबतचा डेमोक्रॅटिक पक्षाचा संशय मात्र अद्याप दूर झालेला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाचे जेरी नाडलेर यांनी म्यूलर यांना पत्र पाठवले असून, २३ मेपर्यंत प्रतिनिधिगृहाच्या न्यायिक समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. म्यूलर यांचा संपूर्ण अहवाल वाचणे आवश्यक असून, विल्यम बार यांच्या विधानांवर विसंबून राहता येणर नाही, असे जेरी यांनी म्हटले आहे.