काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांचे जमीन प्रकरण मंजूर करणारे सहायक अधिकारी दलबीर सिंग यांना भाजप सरकारने सोमवारी निलंबित केले, वढेरा व स्थावर मालमत्ता कंपनी डीएलएफ यांच्यातील जमिनीचा २०१२ मधील करार त्यांनी मंजूर केला होता. गुडगाव जिल्ह्य़ातील रोझका गुरजर गावातील एका जमीन व्यवहारातील गरप्रकाराचे कारण दाखवून सरकारने त्यांना निलंबित केले असले, तरी खरे कारण वढेरा यांचा जमीन गरव्यवहार हाच आहे. आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी डीएलएफ जमीन करार झाल्यानंतर काही दिवसांतच तो रद्दबातल ठरवला होता, परंतु दलबीरसिंग यांनी जुल २०१४ मध्ये महसुली नोंदी बदलून तो करार पुनरुज्जीवित केला होता. दलबीरसिंग हे हरयाणातील एका माजी मंत्र्याशी संबंधित असून गुरगाव फरिदाबाद येथे त्यांची १० वष्रे नियुक्ती होती. दलबीरसिंग यांना गुडगाव उपआयुक्तांच्या अहवालानंतर निलंबित करण्यात आले आहे असे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
वढेरा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी या कंपनीने गुडगावनजीक शुकोहपूर येथे २००८ मध्ये तीन एकर जमीन साडेसात कोटींना घेतली होती. काही काळाने हरयाणाच्या शहर नियोजन विभागाने त्या भागात २.७१ एकरावर व्यावसायिक वसाहत उभारण्याचे ठरवले. २००८ मध्ये स्कायलाइट व डीएलएफ यांच्यात जमीन विक्रीचा करार झाला व वढेरा यांनी या कंपनीला जमीन ५८ कोटींना विकली. डीएलएफला जमीन विकल्याचा करारनामा २०१२ मध्ये झाला.