आर्थिक अफरातफर प्रकरणात चौकशीसाठी रॉबर्ट वड्रा सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. मागच्या तीन दिवसात चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर होण्याची त्यांची ही तिसरी वेळ आहे. बुधवारी सहा तास तर गुरुवारी तब्बल नऊ तास रॉबर्ट वड्रा यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली.

बुधवारी तब्बल सहा तास चाललेल्या या चौकशीत रॉबर्ट वड्रा यांना ३६ प्रश्न विचारण्यात आले. यावेळी रॉबर्ट वड्रा यांनी आपली लंडनमध्ये कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला. तसंच डीलमध्ये सहभागी असणाऱ्या कोणालाही ओळखत नसल्याचं सांगितलं.

रॉबर्ट वड्रा बुधवारी चौकशीसाठी पहिल्यांदा सक्तवसुली संचलनालयासमोर (ईडी) हजर झाले होते. यावेळी त्यांची पत्नी आणि काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांच्यासोबत होत्या. रॉबर्ट वड्रा यांना सक्तवसुली संचलनाल कार्यालयात सोडून प्रियंका गांधी परतल्या. पटियाळा न्यायालयाने आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रॉबर्ट वड्रा यांनी हे आपल्याविरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

वड्रा यांच्या परदेशातील अघोषित संपत्तीसाठी मनोज अरोराने निधीची व्यवस्था केली असा ईडीचा दावा आहे. रॉबर्ट वड्रा प्रियंका गांधी यांचे पती असून नुकतीच प्रियंका यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.