आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांची बुधवारी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) कसून चौकशी करण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या या चौकशीत रॉबर्ट वड्रा यांना ३६ प्रश्न विचारण्यात आले. यावेळी रॉबर्ट वड्रा यांनी आपली लंडनमध्ये कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला. तसंच डीलमध्ये सहभागी असणाऱ्या कोणालाही ओळखत नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयासमोर (ईडी) हजर झाले होते. यावेळी त्यांची पत्नी आणि काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांच्यासोबत होत्या. रॉबर्ट वड्रा यांना सक्तवसुली संचलनाल कार्यालयात सोडून प्रियंका गांधी परतल्या. पटियाळा न्यायालयाने आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रॉबर्ट वड्रा यांनी हे आपल्याविरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणात रॉबर्ट वड्रा यांची लंडनमध्ये नऊ ठिकाणी संपत्ती असून त्याची कोटींमध्ये किंमत असल्याचा आरोप आहे. २००५ ते २०१० दरम्यान वड्रा यांनी ही संपत्ती खरेदी केली असल्याचं सांगितलं जात आहे. सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, रॉबर्ट वड्रा यांनी आर्म्स डिलर संजय भंडारी आणि त्याचा चुलत भाऊ सुमीत चढ्ढा यांच्यासोबत कोणतेही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. यासोबतच लंडनमधील संपत्तीत आपला सहभाग नसल्याचाही दावा केला आहे.

रॉबर्ट वड्रा यांनी यावेळी आपण मनोज अरोराला ओळखत असल्याचं सांगितलं. मनोज अरोरा स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. कंपनीचा माजी कर्मचारी आहे. वड्रा यांच्याशी संबंधित या कंपनीने २००८ मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून ३.५ एकर जमीन ७.५० कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन ५८ कोटी रुपयांना विकली आणि ५०९ कोटी रुपये नफा कमाविला, अशी नोंद एफआयआरमध्ये आहे. आपण मनोज अरोराला ओळखत असलो तरी त्याने आपल्यासाठी काही ई-मेल लिहिले नसल्याचं रॉबर्ट वड्रा यांनी सांगितलं असल्याचं सुत्रांकडून कळलं आहे.

काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ईडीसमोर चौकशीला जाताना पती रॉबर्ट वड्रा यांना सोबत देऊन एकाप्रकारे विरोधकांना उत्तर दिलं. पत्रकारांनी प्रियंका गांधी यांना रॉबर्ट वड्रा यांच्या चौकशीबद्दल विचारलं असता आपण आपल्या कुटुंबाच्या पाठिशी ठामपणे उभ्या असल्याचं सांगितलं.