काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना देशाबाहेर प्रवास करण्यासाठी सीबीआय विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. वैद्यकीय उपचारासाठी रॉबर्ट वढेरा यांना सहा आठवड्यांसाठी देशाबाहेर प्रवास करण्याची परवानगी न्यायालयाकडून देण्यात आली आहे. रॉबर्ट वढेरा यांनी आतड्यातील ट्यूमरच्या उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने रॉबर्ट वढेरा यांना देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली असली, तरी लंडनला जाण्याची मुभा देण्यात आलेली नाही.

रॉबर्ट वढेरा यांनी दिल्ली येथील न्यायालयात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. यावेळी त्यांनी आतड्यातील ट्यूमरच्या उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली होती. यापूर्वी त्यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडे (ईडी) परदेशात जाण्यास परवानगी देण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने ३ जूनपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानुसार आज न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे.

पण न्यायालायने आपल्या निर्णयात रॉबर्ट वढेरा यांनी अमेरिका आणि नेदरलँण्डला या दोन देशात प्रवासाची परवानगी दिली असून लंडनला प्रवास करु शकत नाही असं स्पष्ट केलं आहे. यानंतर रॉबर्ट वढेरा यांनी लंडनला प्रवास करण्यासाठीची विनंती मागे घेतली आहे. यादरम्यान जर एखादी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलेली असेल, तर ती या काळात रद्द राहील असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.