काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याविरोधात केंद्र सरकारने कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आयकर खात्याने वढेरा यांच्या जमीन तसेच आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीचे प्रमुख अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
जमीन व्यवहारातील आघाडीची कंपनी असलेल्या डीएलएफशी केलेल्या व्यवहारांमुळे वढेरा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी वादाच्या केंद्रस्थानी आहे. २००५-२००६ पासून खरेदी-विक्री व्यवहारांचे तपशील देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. डीएलएफशी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीच्या झालेल्या व्यवहार, ओंकारेश्वर प्रॉपर्टीशी असलेले संबंध तसेच हरयाणात जमीन अधिग्रहण करताना व्यापारी परवाना किंमत या बाबींचा तपशील मागवल्याचे आयकर खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
हरयाणातील मनेसर येथे स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीकडे ३.५३ एकर जमीन तसेच राजस्थानमधील बिकानेरमध्ये ४७० एकर जमीन आहे. बुधवारी याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी वारंवार प्रयत्न केला असता वढेरा यांनी प्रतिसाद दिला नाही.
आयकर खात्याने २४ डिसेंबरला विविध २२ मुद्दय़ांवर स्कायलाइट करून तपशील मागवला आहे.
*स्थावर मालमत्ता विक्रेत्यांची यादी तसेच स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीला विक्री केलेली तारीख
*दिलेल्या व घेतलेल्या कर्जाचे विवरण
*२००५-२००६ पासून संचालक मंडळांच्या बैठकीचे इतिवृत्तांत
*३१ मार्च २०१२ च्या ताळेबंदातून ७९.५६ वजावटीबाबत विचारणा
*डीएलएफ युनिव्हर्सल व डीएलएफ रिटेल डेव्हलपर्सकडून घेतलेल्या कर्जाचा तपशील
*कृषी जमीन विक्रीतून मिळालेल्या नफ्याचे विवरण
*स्कायलाइटच्या संचालकांचा पूर्ण तपशील. वढेरा हे एक या कंपनीचे संचालक आहेत. तसेच त्याच्या उपकंपन्या तसेच संयुक्त प्रकल्प जसे साकेत कोर्टयार्ड हॉस्पिटॅलिटी, साकेत हॉलिडे रेसॉर्ट्स आणि डीएलएफ साकेत डॉटेल्स
*साकेत हॉस्पिटॅलिटीशी संबंधित कंपन्यांचा तपशील
*स्कायलाइटने ताब्यात साकेत कोर्टयार्ड हॉस्पिटॅलिटीला १.३६ कोटी तोटय़ाबाबत विचारणा
*कर्जदारांचे तपशील