चीनमधील प्रयोग
जगात प्रथमच चिनी वृत्तवाहिन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोट म्हणजे यंत्रमानवांना हवामानविषयक माहिती सादरकर्त्यांचे काम दिले आहे. ‘लाइव्ह ब्रेकफास्ट’ शोमध्ये हा प्रयोग करण्यात आला असून, पुन्हा एकदा पत्रकारांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. आता टीव्ही अँकर म्हणजे सादरकर्त्यांचे काम यंत्रमानव सहज करू शकतील अशी आताची बातमी आहे.
बातम्या व लेख लिहिणारे यंत्रमानव चीनने आधीच विकसित केले आहेत, पण ते दिलेल्या माहितीच्या आधारे बातमी किंवा लेख लिहून दाखवतात. बातमीची रचना यंत्रमानवाला व्यवस्थित शिकवता येते व वार्ताहराने आणलेली माहिती त्याला दिली तर तो बातमी तयार करून देणार यात शंका नाही, कारण तो उपलब्ध माहितीच्या आधारे लेख लिहू शकतो हे सिद्ध झाले आहे. मंगळवारी सकाळी शियाओआईस या यंत्रमहिला सादरकर्तीने म्हणजे टीव्ही अँकरने या थंडीच्या मोसमात मी हे हवामान बातम्यांचे नवीन काम सुरू करीत आहे, असे सांगून कार्यक्रमात भाग घेतला. शियाओआईस ही यंत्रमानव स्त्री म्हणजे मायक्रोसॉफ्टने तयार केलेली आज्ञावली असून, त्यात स्मार्ट क्लाउड व बिग डेटा या साधनांचा वापर करण्यात आला आहे. कामाच्या पहिल्या दोन दिवसांत शियाओआईस या यंत्रमानव महिलेने तिच्या गोड आवाजाने सर्वानाच मोहात पाडले आहे. शांघाय न्यू इव्हेंट्स ड्रॅगन टीव्हीच्या कार्यक्रमात ती विविघ घटनांवर भाष्यही करते. मायक्रोसॉफ्टच्या मते लिखित मजकूर व बोलणे यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या यंत्रमानव सादरकर्तीची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे तिचे बोलणे नसíगक वाटते. तिचा आवाज हा मानवी आवाजाच्या जवळ जाणारा आहे. भावना तंत्रज्ञानाच्या मदतीने ती हवामान माहितीवर लगेच टिप्पणी करते. यंत्रमानव सादरकर्तीचे हे यशस्वी पदार्पण टीव्ही कार्यक्रम सादर करणाऱ्यांच्या पोटावर पाय आणू शकते. हवामान सादरकर्त्यांची तर नोकरी नक्कीच जाऊ शकते. साँग जियाँदिमग या शांघाय मीडिया समूहाच्या संचालकांनी सांगितले, की मानवी वृत्तनिवेदक किंवा सादरकर्त्यांची जागा पूर्णपेणे शियाओआईस ही यंत्रमानव स्त्री घेऊ शकत नाही, माहितीचे विश्लेषण करण्यात यंत्रमानव मदत करू शकतात. यंत्रमानव वार्ताहर मानवी वार्ताहरांचे काम करू शकतात व देशभरात त्यांना काम देता येईल, त्यामुळे चिनी वार्ताहरांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. एका चिनी पत्रकाराने सांगितले, की अमेरिका व युरोपात असे यंत्रमानव वार्ताहर काम करीत आहेत, पण आज ते चीनमध्येही आले आहेत, त्यांच्याशी स्पर्धा कशी करणार हा प्रश्नच आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये टेन्सेंट या तंत्रज्ञान कंपनीने यंत्रमानवाच्या मदतीने उद्योगविषयक लेख लिहिला होता. ९१६ शब्दांच्या या लेखात एकही चूक नव्हती व ड्रीमरायटर या सॉफ्टवेअरच्या मदतीने तो संकेतस्थळावरही टाकण्यात आला होता.