चीनमध्ये यंत्रांचा वापर वाढत असून त्यातच आता यंत्रमानवांचा वापरही खूप मोठय़ा प्रमाणात दिसत आहे. माणसाला जी कामे खूप श्रमाची वाटतात किंवा कंटाळवाणी वाटतात ती आता यंत्रमानव तेथे करीत आहे. रेस्टॉरंटमध्ये खानसाम्याचे कामही आता यंत्रमानव करीत आहेत. चीनमधील अगदी छोटय़ा हॉटेलांमध्येही आता यंत्रमानव दिसत आहेत. ठरवून दिलेले खाद्यपदार्थ वेगाने व स्वस्त दरात करून देण्याचे काम ते करीत आहेत.
यंत्रमानव हे खानसाम्याचा वेश परिधान करून काम करतात. त्यात पीठ मळणे, नूडल्स उकळत्या पाण्यात बुडवणे अशी असंख्य कामे ते करीत आहेत. छोटे हॉटेल चालवणाऱ्या झाओ यांनी सांगितले, की खानसामा ठेवायचा म्हटला तर त्यासाठी वर्षांला ४०००० युआन (६४०० अमेरिकी डॉलर) द्यावे लागतात. हेच काम जर मी यंत्रमानव खरेदी केला तर १०००० युआन (१६०० अमेरिकी डॉलर) इतक्या कमी खर्चात होते.
खानसाम्याचे काम करणारा रोबोट म्हणजे यंत्रमानव तयार करणाऱ्या कुई रुंगवान या ३८ वर्षांच्या शेतकऱ्याने सांगितले, की आपण तीन हजार रेस्तराँना हे यंत्रमानव विकले आहेत. २०१० पासून चीनमध्ये यांत्रिक युग अवतरल्याचा हा परिणाम आहे. २०१० मध्ये हेबेई प्रांतातील रुंगवान यांनी या यंत्रमानवाचे पहिले पेटंट घेतले असून त्यांच्या नावावर या संशोधनाची चार पेटंट आहेत.
चीनमध्ये वेतन हे वार्षिक १० ते २० टक्क्यांनी वाढत आहे, त्यामुळे यंत्रांचे महत्त्व वाढले आहे. अगदी छोटय़ा रेस्तराँपासून ते मोठय़ा कारखान्यांपर्यंत यंत्रमानवांनी कामांचा ताबा घेतला आहे. स्वस्त मिळणाऱ्या या यंत्रमानवांनी चीनची अर्थव्यवस्थाही बदलली आहे. यंत्रमानवांचे डिझाइन हा एक महत्त्वाचा मुद्दा असून हे यंत्रमानव वेल्डिंग, पेंटिंग, पॅकेिजग अशी कामेही ते करतात. त्यांचे डिझाइन वेगळे आहे. पुढील वर्षी चीन हे जगातील यंत्रमानवांची सर्वात मोठी बाजारपेठ बनेल अशी अपेक्षा आहे. चीनच्या ‘८६३ प्रोग्रॅम’ या विशेष प्रकल्पातील तज्ज्ञ झाओ जी यांनी सांगितले, की दरवर्षी ३२००० औद्योगिक यंत्रमानवांची गरज असते. चीनच्या कंपन्यांनी यंत्रमानवांचा वापर हा कौशल्य असलेल्या कामगारांचे वेतन वर्षांला ५०००० युआन म्हणजे ८०६० अमेरिकी डॉलर झाल्यानंतर यंत्रमानवांचा विचार सुरू केला आहे. झिंगसाँग रोबोट ऑटोमेशन कंपनीचे टॅन झेक यांनी सांगितले, की यामागचे गणित साधे आहे. एक यंत्रमानव हा किमान तीन वेल्डरचे काम करीत असतो. सध्या एका यंत्रमानवाची किंमत दीड लाख युआन (२४१०० अमेरिकी डॉलर) आहे ही किंमत तीन वेल्डरच्या एक वर्षांच्या वेतनाइतकी आहे. एक यंत्रमानव हा साधारणपणे तीन ते पाच वर्षे सेवा देतो, त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा तो स्वस्त पर्याय आहे.
चीनमधील नोकऱ्यांना या यंत्रमानवांचा धोका आहे किंवा कसे याबाबत टॅन यांनी सांगितले, की जितक्या वेगाने यंत्रमानवांच्या किमती कमी होतील तेवढय़ा वेगाने नोकऱ्यांची संख्या कमी होईल. वेल्डिंग करणारा यंत्रमानव हा पाच वर्षांपूर्वी पाच लाख युआनला ( ८०६०० अमेरिकी डॉलर) मिळत होता.
आता त्याच्या किमती तिपटीने खाली आल्या आहेत. चीनमध्ये १५ ते ५९ वयोगटातील कामगारांची संख्या ३.४५ दशलक्षांनी कमी होऊन ती ९३७.२७ दशलक्ष इतकी आहे. वयस्कर कामगारांची समस्या ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये भेडसावणार आहे तेव्हा यंत्रमानवांचा उपयोग कामाचा वेग राखण्याकरता होणार आहे.