अमेरिकी फौजांनी दक्षिण कोरियासमवेत संयुक्त लष्करी कवायती पार पाडल्यानंतर उत्तर कोरियाने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया नोंदविली असून ‘अमेरिकेचे हिशेब चुकते करण्यास आम्ही सज्ज आहोत’, असा गर्भित इशारा उत्तर कोरियाच्या नेत्याने दिला आहे. दक्षिण कोरियाच्या फौजांसमवेत कवायती करताना अमेरिकेने अण्वस्त्रसज्ज असलेल्या ‘बी-२’ बॉम्बर विमानांचीही प्रात्यक्षिके केल्यामुळे उत्तर कोरिया कमालीचा संतप्त झाला आहे.
उत्तर कोरियाने अशा प्रकारे धमकावणीची भाषा केली असली आणि लागलीच युद्ध होणार नसले तरी दक्षिण कोरियाने आपली भूमिका मवाळ करावी, अमेरिकेकडून थेट मदत मिळवावी, हा उत्तर कोरियाचा हेतू असल्याचे सांगण्यात येते.
उत्तर कोरियाचे युवा नेते किम जाँग ऊन यांनी शुक्रवारी आपल्या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एकंदर युद्धसज्जतेसंबंधीच्या योजनेबद्दल चर्चा केली. दक्षिण कोरिया, गुआम, हवाई आदी ठिकाणी हल्ले करण्यासाठी फौजांनी सज्ज रहावे, असे आदेश किम ऊन यांनी दिले. सध्याचे एकूणच अमेरिकेचे साम्राज्यवादी धोरण बघता त्यांच्याशी असलेले हिशेब चुकते करण्याची आता वेळ आली आहे, असे खुले आव्हान किम यांनी दिले आहे. अमेरिकेची बॉम्बर विमाने येथे आल्यामुळे अमेरिकेचे उत्तर कोरियाविरोधातील आक्रमकतेचे वर्तन आता अत्यंत बेजबाबदारपणाच्या टप्प्यावर पोहोचले असून ते आता धमक्या आणि दबावाच्याही पलीकडे गेले असल्याचे मत किम यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. या एकूण पाश्र्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लष्करात सामील होण्यासंबंधी किम यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी हजारो कोरियन नागरिक एका मेळाव्यात जमले होते. ‘अमेरिकी साम्राज्यवाद्यांना नष्ट करा, अमेरिकी चढाईखोरांना हाकलून द्या’ अशा घोषणा हे सर्वजण देत होते.