बांगलादेशात रोहिंग्या मुस्लिम शरणार्थींना या आठवड्याच्या मध्यात म्यानमारला पाठवले जाणार आहे. यापासून वाचण्यासाठी रोहिंग्या मुस्लिम शरणार्थी शिबिरातून पळून जात आहेत. येत्या गुरुवारी बौद्ध बहुल म्यानमारमध्ये या रोहिंग्यांना पाठवण्याची बांगलादेश सरकारची योजना आहे.

लष्कराकडून झालेल्या अत्याचारानंतर या रोहिंग्यांनी म्यानमारमधून पळ काढला होता. संयुक्त राष्ट्र संघाने हा वंश भेद असल्याचा आरोप केला होता. शिबिरात सहभागी असलेल्या रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये पाठवले जाण्याची भीती असल्यामुळे त्यांनी पळ काढला आहे. यात परत पाठवण्याच्या यादीत वरच्या स्थानावर असलेले शिबिरातून फरार झाले आहेत.

जामतोली शरणार्थी शिबिरातील नूर इस्लाम म्हणाले की, अधिकारी शरणार्थींना परत जाण्यासाठी सातत्याने प्रेरित करत होते. परंतु, याचा उलटा परिणाम झाला आणि लोक इथून पळून जात आहेत. योजनेनुसार येत्या गुरुवारी सुमारे २२६० रोहिंग्या मुसलमानांना दक्षिण पूर्वी कॉक्स बाजार जिल्ह्यातील सीमेवरुन म्यानमारमध्ये परत पाठवले जाणार आहे.