संयुक्त राष्ट्राची माहिती, हजारो रोहिंग्या अद्यापही प्रतीक्षेत

म्यानमारमधील हिंसाचारामुळे २५ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास पावणेसहा लाख रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे, तर  हजारो जण सीमारेषेवर ताटकळले असल्याचे संयुक्त राष्ट्राने जीनिव्हा येथील पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

म्यानमारच्या राखिने प्रांतामध्ये हिंसाचार सुरू आहे. या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांच्या लष्कराने कारवाई सुरू केली आहे. २५ ऑगस्टपासून म्यानमारच्या सुरक्षा दलांवर रोहिंग्यांकडून हल्ले होत आहेत. याविरोधात उघडलेल्या संयुक्त कारवाईमुळे रोहिंग्या बांगलादेशमध्ये स्थलांतर करत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार आजपर्यंत ५ लाख ८२ हजार रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे. यापूर्वी गेलेल्या रोहिंग्यांची कोणतीही आकडेवारी नसल्याचे राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या मॅरिक्सी मेर्काडो यांनी सांगितले.

निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाखेच्या प्रवक्त्या म्हणाल्या की, आणखी हजारो रोहिंग्या मुस्लीम बांगलादेशमध्ये स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे पुनर्वसन करणे आमच्यासाठी आव्हानात्मक काम आहे. शनिवार, रविवारी ४५ हजार रोिहग्यांनी स्थलांतर केले. त्यांची गावेच्या गावे जाळण्यात आल्याने त्यांनी स्थलांतर केले. या निर्वासितांना तातडीने प्रवेश देण्याच्या सूचना बांगलादेशला केल्या आहेत.