रोहिंग्या मुस्लिमांना भारतात आश्रय देण्यावरुन वाद सुरु असतानाच जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी रोहिंग्यांना देशाबाहेर काढण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पाकिस्तानकडून रोहिंग्यांचा दहशतवादी म्हणून वापर होऊ शकतो, त्यामुळे त्यांना परत पाठवण्याचा निर्णय योग्यच आहे, असे निर्मल सिंह यांनी म्हटले आहे.

म्यानमारमधून पळून भारतात आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांवरुन देशातील राजकीय वातावरण तापले आहे. भारतात सुमारे ४० हजार रोहिंग्या मुस्लिम असून या सर्वांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले असतानाच आता जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी रोहिंग्या मुस्लिमांवर प्रतिक्रिया दिली. ‘रोहिंग्या मुस्लिमांनी भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश केला असून त्यांचा पाकिस्तानकडून दहशतवादी म्हणून वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना देशाबाहेर काढणे गरजेचे आहे’ असे सिंह यांनी म्हटले आहे.

म्यानमारमधील लाखो रोहिंग्यांनी बांगलादेश आणि भारतात पळ काढला असून रोहिंग्यांचा प्रश्न गंभीर रुप धारण करत आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर काढण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. ‘रोहिंग्या मुस्लिम हे शरणार्थी नसून ते बेकायदा स्थलांतरितच आहेत. शरणार्थ्यांना कायदेशीरप्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण रोहिंग्या मुस्लिमांबाबत असा प्रकार नाही’ असे स्पष्टीकरण सिंह यांनी दिले होते.