दिल्लीतील हायप्रोफाईल रोहित शेखर हत्या प्रकरणात पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. रोहितच्या हत्या प्रकरणात पत्नी अपूर्वाला अटक झाली आहे. या हत्येमागे पती, पत्नी आणि वो चा अँगल आहे. रोहित आणि अपूर्वाच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल नव्हते. लग्नानंतर अपूर्वाला रोहितच्या एक महिला मैत्रिणीबद्दल समजले. ती महिला रोहितची दूरची नातेवाईक होती. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

रोहित तिला भेटायला जायचा. रोहितची या महिलेबरोबर असणारी मैत्री अपूर्वाला मान्य नव्हती. त्यावरुन त्यांच्यात खडके उडायचे. त्याशिवाय संपत्तीवरुन त्यांच्यामध्ये वाद होते. घटस्फोट घेण्याबद्दलही त्यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. ११ एप्रिलला रोहित आणि त्याची आई उज्वला लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी उत्तराखंडला गेले होते. त्यावेळी रोहितची दूरची नातेवाईक असणारी ती महिला त्यांच्यासोबत होती.

अपूर्वा दिल्लीमध्येच होती. तिला या गोष्टीची कल्पना नव्हती. रोहित उत्तराखंडमध्ये असताना अपूर्वाने त्याला व्हॉट्स अॅपवरुन व्हिडिओ कॉल केला. रोहित त्यावेळी त्या महिलेसोबत मद्यपान करत होते. दारुच्या नशेत रोहितने अपूर्वाचा तो व्हिडिओ कॉल उचलला. रोहितला त्या महिलेसोबत पाहिल्यानंतर अपूर्वाला धक्का बसला तिचा संयम सुटला. त्यांच्यात वाद झाला.

१५ एप्रिलला रोहित दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील त्याच्या घरी पोहोचला. त्या रात्री त्याने कुटुंबासोबत भोजन केले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी १६ एप्रिल रोजी रोहितचा संशयास्पद मृत्यू झाला. रोहित शेखर तिवारी यांचा गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

या प्रकरणी पोलिसांनी अखेर रोहित शेखर यांची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे. अपूर्वा यांची तब्बल तीन दिवस चौकशी देखील करण्यात आली. अपूर्वाने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी घरी कोणीही नव्हते. यादरम्यान, पती- पत्नीमध्ये भांडण झाले आणि अपूर्वाने संतापाच्या भरात गळा दाबून पतीची हत्या केली.