काळा पैसा पांढरा करणारा तसेच नोटबदलाची हेराफेरी करणारा दिल्लीतील वकील रोहित टंडनला गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. नोटाबंदीनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून ७० कोटींचा काळा पैसा पांढरा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने त्याची चौकशीही केली होती. त्यानंतर बुधवारी दिल्लीत कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकाला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. छापेमारीत रोहित टंडनच्या ऑफिसमध्ये १३.५ कोटींची रोकड सापडली होती.
रोहित टंडनच्या घरातून मिळालेल्या नोटांच्या चौकशीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती त्याच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे लागले होते. त्याआधारे बुधवारी दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावरील कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकाला अटक केली होती. साकेत न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली होती. ईडीच्या चौकशीत कोटक महिंद्रा बँकेचा व्यवस्थापक आशिष याने 38 कोटी रुपयांचा बोगस ड्राफ्ट तयार केला होता. त्याने १३ कोटींच्या नोटा बदलल्या होत्या. ईडीने त्याला हवाला व्यापारी पारसमल लोढा आणि दिल्लीचा वकील रोहित टंडनशी संबंधित हेराफेरीत सहभाग असल्याच्या आरोपावरून अटक केली होती.
दरम्यान,  आयकर विभागाने रोहित टंडनच्या दिल्लीतील ग्रेटर कैैलाश परिसरातील कार्यालयावर छापा टाकला होता. तेथून कोट्यवधी रुपये जप्त केले होते. चौकशी पथकाने जवळपास १३.५ कोटी रुपये जप्त केले होते.
कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत दोन संशयित खाते असल्याचे समोर आल्यानंतर ते आयकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात आले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँक व्यवस्थापक आशिष कुमारने बोगस नावाने ३८ कोटींचा ड्राफ्ट तयार केला होता. तो आयकर विभागाने रद्द केला होता. त्याने रोहित टंडनच्या १३ कोटींच्या नोटा बदलून दिल्या होत्या. आशिष कुमारने ५१ कोटी रुपये घेऊन नोटा बदलून दिल्याची कबुली रोहित टंडनने दिली आहे. नोटा बदलून देण्यासाठी त्याने दीड कोटींचे कमिशनही घेतले होते, तसेच तो फार्म हाऊसवरही आला होता, असे त्याने सांगितले होते.
ईडीने रोहित टंडनच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅपमधून अनेक लोकांशी केलेल्या संभाषणाची माहिती मिळवली आहे. दुसरीकडे ईडीच्या चौकशीत रोहितसह अनेक बड्या उद्योजकांची नावे समोर आली होती. ईडीकडून लवकरच सर्व उद्योजकांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.