रोहित वेमुला या आत्महत्या केलेल्या तरूणाच्या आईनं हैदराबाद विद्यापीठानं दिलेली आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई स्वीकारली आहे. वकिलांच्या सल्ला ऐकून ही नुकसान भरपाई आपण स्वीकारत असल्याचे रोहितची आई राधिका यांनी सांगितलं आहे. हैदराबाद विद्यापीठामध्ये रोहित हा रीसर्च स्कॉलर म्हणून शिकत होता. 16 जानेवारी 2016 या दिवशी त्यानं हॉस्टेलच्या खोलीत पंख्याला लटकावून घेत आत्महत्या केली होती. विद्यापीठानं केलेल्या कारवाईला वैतागून त्यानं आत्महत्या केली आणि सरकारला प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं.

तत्कालिन मनुष्यबळ मंत्री स्मृची इराणी यांच्यावरही प्रचंड टीका झाली होती. तसोच याप्रकरणी पत्र लिहून आपली भूमिका मांडणाऱ्या कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्यावरही डाव्यांनी टीकेचा भडीमार केला होता. रोहित हा नक्की दलित होता का, त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारणं काय, त्याच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे का याचप्रमाणे केंद्रातील हिंदुत्ववादी सरकार आपली विचारसरणी लोकांवर लादत आहे का अशा प्रकारच्या वादविवादांनी वातावरण ढवळून निघालं होतं.

रोहित वेमुला प्रकरणानंतर दिल्लीमध्येही कन्हैय्या कुमार व त्याच्या साथीदारांनी पंतप्रधानांसह भाजपाला लक्ष्य केलं होतं. भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनीही रोहित हा दलित नसल्याचं सांगत या प्रकरणाला जातीयवादी स्वरूप देण्यात येत असल्याचा आरोप केला तसेच दलित या अंगानं या प्रकरणाला महत्त्व नसल्याचे म्हटले होते.

तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप रोहितसह पाच जणांवर होता आणि त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली होती. रोहितने नैराश्यातून आत्महत्या करण्यामागे ही कारवाई असल्याचेही सांगण्यात येत होते. गेली दीड दोन वर्षे रोहित वेमुलाची आत्महत्या हा सर्वांच्या चिंतेचा विषय झाला होता. या आत्महत्याप्रकरणी हैदराबाद विद्यापीठानं त्याच्या आईला आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ केली असून त्याची आई राधिका यांनी ती स्वीकारली आहे.