हैदराबाद मध्यवर्ती विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अशोककुमार रूपनवाल यांची नियुक्ती केली. दरम्यान, आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी या विद्यापीठातील शिक्षकांनी गुरुवारी उपोषण केले.
आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे सामाजिक न्याय संयुक्त कृती समितीने जाहीर केले असतानाच रूपनवाल यांच्या एकसदस्यीय न्यायिक आयोगाच्या नियुक्तीचा निर्णय जाहीर करण्यात आला.
निवृत्त न्यायाधीश रूपनवाल हे घटनाक्रमाचा, स्थितीचा आढावा घेतील आणि वस्तुस्थिती जाणून घेतील, असे मनुष्यबळविकास मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. या आयोगाला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू आप्पा राव पोडिले यांची हकालपट्टी करावी आणि प्रभारी कुलगुरू विपीन श्रीवास्तव यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी तीन शिक्षकांनी गुरुवारी एक दिवसाचे उपोषण केले.