हैदराबाद विद्यापीठातील कुलगुरू पी. आप्पा राव दीर्घ सुटीवरून पुन्हा कार्यालयात रुजू झाल्याचा निषेध म्हणून विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांनी मंगळवारी त्यांच्या घरात जाऊन तोडफोड केली. आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी हा हल्ला केला. याच संघटनेचा विद्यार्थी रोहित वेमुला याने आत्महत्या केल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ते दीर्घ रजेवर गेले होते.
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतीगृहामध्ये १७ जानेवारीला रोहित वेमुला याने आत्महत्या केली. त्यानंतर या विद्यापीठामध्ये तीव्र आंदोलन सुरू झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू दीर्घ रजेवर गेले होते. कुलगुरूंना पदावरून हटविण्याची मागणी विद्यार्थी संघटनेकडून केंद्रीय मनुष्यबळ विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर त्यांना दीर्घ रजेवर जाण्यास सांगण्यात आले होते.
मंगळवारी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या घरात जाऊन तेथील फर्निचर, कॉम्प्युटर आणि इतर सामानाची तोडफोड केली. पी. आप्पा राव यांनी एक पत्रकार परिषदही बोलावली होती. विद्यार्थ्यांनी ही पत्रकार परिषद घेण्यासही त्यांना मज्जाव केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. रोहित वेमुलाच्या आत्महत्येला कुलगुरूच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी विद्यापीठात येऊच नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.