रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर रजेवर गेलेले हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव पोडिले यांनी मंगळवारी पुन्हा कामावर रुजू होण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थ्यांच्या एका गटाने कुलगुरूंच्या निवासस्थानी धुडगूस घालून मोडतोड केली.
पोडिले यांनी ते कामावर रुजू होत असल्याचा इ-मेल मंगळवारी सकाळी पाठवला होता त्यामुळे पोडिले रुजू होत असल्याचे विद्यार्थी व प्राध्यापकांना कळले होते. रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन केले होते. पोडिले व केंद्रीय कामगार मंत्री बंदारू दत्तात्रेय व अभाविपचा विद्यार्थी सुशील कुमार यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोडिले रुजू होणार असल्याची बातमी समाजमाध्यमावरून पसरली व विद्यार्थी शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी जमले. कुलगुरूंच्या निवासस्थानासमोरही, अनेक विद्यार्थी जमले होते. विद्यार्थ्यांनी कुलगुरू पोडिले यांच्या अधिकृत निवासस्थानी हल्ला केला. पोडिले पत्रकार परिषदही घेणार होते त्याआधीच हा हल्ला झाला. कुलगुरूंना अटक करण्यात यावी कारण त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. पोडिले यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासात अटक होणे अपेक्षित होते पण त्यानंतर साठ दिवसांनीही अटक झालेली नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. अभाविपच्या मुलांनी दार आतून लावून घेतले होते व आम्ही दार उघडण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत बरेच नुकसान झालेले होते. टीव्ही खाली पाडण्यात आला होता. असे काही प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी सांगितले. अभाविपचा विद्यार्थी नेता सुशील कुमार याने सांगितले की, कुलगुरूंच्या घरात अभाविपचे विद्यार्थी नव्हते. काहींच्या मते पोलीस, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात धुमश्चक्री झाली. चित्रीकरण सुरू झाले असता विद्यार्थ्यांनी पत्रकारांना धमकावले. काही पत्रकारांनी कुलगुरूंच्या घरापुढे निदर्शने केली.