दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना मोदी, राहुल गांधी, मुकेश अंबानी यांच्यासह माध्यमांनाही टीकेचे लक्ष्य केले. हे सगळेच भ्रष्ट असल्याचा आरोप केजरीवाल यांनी करत ‘आम आदमीला’ ‘आप’हाच पर्याय असल्याचा दावा केला.
येथे झालेल्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो लोक सभेला उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी हरियानातील भूपेंद्रसिंह हुडा सरकारला भ्रष्टाचारावरून केजरीवाल यांनी लक्ष्य केले. हुडा सरकारने शेतकऱ्यांची जमीन रिलायन्स आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वधेरा यांना दिल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा एकमेव मार्ग असलेली जमीनही सरकारने ठेवली नाही इतके हे सरकार निर्दयी असल्याचा आरोप त्यांनी हुडा यांच्यावर केला. त्यांना आता घरी बसवा असे आवाहन त्यांनी केले. मुकेश अंबानी यांची तुलना त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी केली. अंबानी देशाची सत्ता चालवत असल्याचा पुनरुच्चार केजरीवाल यांनी केला. नैसर्गिक वायूच्या दरांवरूनही त्यांनी पुन्हा एकदा अंबानी यांच्यावर टीका करीत राहुल गांधी आणि मोदींच्या सभांना ते निधी देत असल्याची टीका केली.
मोदींच्या सभांवर कोटय़वधींची उधळपट्टी होते. चहा विक्रेते होतो असा दावा मोदी करतात. सभांसाठी हेलिकॉप्टर आणि विमाने कोठून वापरतात याचे उत्तर मोदींनी द्यावे असे आव्हान त्यांनी दिले. तुम्ही सध्या राहताय त्यात आनंदी असाल तर मोदी किंवा राहुल गांधी यांना मत द्या. अन्यथा आम आदमी पक्ष तुमचे जीवन सुखकर करेल असे आश्वासनही दिले. माध्यमे खोटे सर्वेक्षण करून भाजपला अनुकूल अशा जनमत चाचण्या दाखवत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.