राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली शाखेतील कार्यकारिणी सदस्य राजीव तुली यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेनंतर ‘वैयक्तिक पातळीवर केलेली टीका-टिप्पणी ही संघाची अधिकृत भूमिका नव्हे,’ असे मत संघाने व्यक्त केले आहे. ‘देश करोनाच्या आपत्तीशी संघर्ष करत असून गरजू लोकांना मदतीचा हात देणे हे संघाचे प्रथम कर्तव्य आहे. एखाद्याच्या वैयक्तिक विधानाशी संघाचा काहीही संबंध नाही,’ असे संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना संघाचे स्वयंसेवक कोणत्या स्वरूपाची मदत करत आहेत, याची माहिती देण्यासाठी आंबेकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी दूरसंचार माध्यमातून संवाद साधला. आता संघाचे लक्ष फक्त लोकांना मदत करण्याकडेच आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे आपापल्या पद्धतीने आणि क्षमतेने करोना रुग्णांना उपचार देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. संघाचे कार्यकर्ते आवश्यक तिथे या सर्वांशी समन्वय साधत आहेत, लोकांचे कष्ट कसे कमी होतील यासाठी स्वयंसेवकही झटत आहेत. त्यामुळे कोणी कोणावर टीका केली याचा विचार संघ करत नाही, असे आंबेकर म्हणाले. ‘दिल्लीत करोनाचा वणवा पेटला असताना दिल्लीतील भाजपचे नेते कोणाला दिसले का? प्रदेश भाजपची कार्यकारिणी विसर्जित केली का?’ असा सवाल करून राजीव तुली यांनी ट्वीटद्वारे भाजप नेत्यांवर टीका केली होती. हे ट्वीट तुलींनी नंतर काढूनही टाकले. या वादापासून संघाने स्वत:ला वेगळे करून तुलींना अप्रत्यक्ष चपराक दिल्याचे मानले जात आहे.