जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून संबंधितांना पत्रे
नवी दिल्ली : प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू आशिष दत्ता, प्रसिद्ध वैज्ञानिक आर. राजारामन यांच्यासह एकूण १२ मानद प्राध्यापकांकडे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रशासनाने शैक्षणिक अभिलेख म्हणजे करिक्युला व्हिटेची मागणी केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. मानद प्राध्यापक हे पद निवृत्त प्राध्यापकांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा या हेतूने दिले जात असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संशोधनही करू शकतात. रोमिला थापर यांच्यासारख्या इतिहासातील विदुषीकडे अशाप्रकारे शैक्षणिक अभिलेखाची मागणी विद्यापीठ प्रशासनाने केल्यामुळे त्याला आक्षेप घेण्यात आला आहे. थापर यांच्यासह १२ जणांना यापुढेही मानद प्राध्यापक पदावर कायम ठेवायचे किंवा नाही याबाबत मूल्यमापन करण्यासाठी शैक्षणिक अभिलेखाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्राध्यापकांना पाठवलेली पत्रे मागे घेण्याची मागणी प्राध्यापक संघटनेने केली आहे
विद्यापीठाच्या कुलसचिवांनी म्हटले आहे की, केवळ थापर यांच्याकडेच नव्हे तर एकूण १२ जणांकडेही शैक्षणिक अभिलेखाची मागणी करण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सांगितले की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कुणाही मानद प्राध्यापकाला काढून टाकण्याचा विचार नाही. केवळ प्रमाणित प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांच्याकडे शैक्षणिक अभिलेखाची मागणी करण्यात आली आहे.
कुलसचिव प्रमोद कुमार यांनी सांगितले की, प्रा. एच. एस .गिल, सी. के. वाष्र्णेय, एस. डी. मुनी, अशोक संजय गुहा, आशिष दत्ता, आर. राजारामन, रोमिला थापर, योगेंद्र सिंह, डी. बॅनर्जी, टी. के. ओमेन, अमित भादुरी, शीला भल्ला यांनाही शैक्षणिक अभिलेखाची मागणी करणारी पत्रे पाठवण्यात आली आहेत. त्यांच्या वयाची ७५ वर्षे ३१ मार्च २०१९ रोजी पूर्ण झाली आहेत, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा आढावा घेण्यात येत आहे. थापर यांच्यासह काहींनी उत्तरे पाठवली असून ज्यांनी उत्तरे पाठवली नाहीत त्यांना स्मरणपत्रे पाठवण्यात येणार आहेत. त्यांच्या उत्तरानंतर समिती शैक्षणिक अभिलेखांचा आढावा घेईल. कुमार यांनी म्हटले आहे की, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही मानद प्राध्यापकाचे पद हे स्थायी असत नाही. विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने शैक्षणिक अभिलेख मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू दत्ता हे प्रसिद्ध रेणवीय जीवशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ आहेत. त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री किताब देण्यात आला होता. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार व प्रियदर्शनी पुरस्काराचे ते मानकरी आहेत, ते विद्यापीठाचे आठवे कुलगुरू होते तसेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लांट जिनोम रीसर्च या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. प्रा. राजारामन यांनी १९६७ मधील भौतिकशास्त्राचे नोबेल विजेते हॅन्स बीथ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच डी केली असून त्यांनी ताऱ्यांच्या केंद्रकीय विश्लेषणावर संशोधन केले आहे. मानद प्राध्यापक पद हे आजीवन असल्याचे तत्कालीन कुलगुरूंनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, असा दावा यातील एका प्राध्यापकाने केला आहे. या पदामुळे आपण इतर ठिकाणची पदे स्वीकारली नाहीत, हे मानद पद असून त्याचा आर्थिक लाभ नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिक्षक संघटनेने म्हटले आहे की, थापर यांच्याकडे शैक्षणिक अभिलेखाची मागणी करण्याचा निर्णय हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.
ज्यांच्या वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत ते मानद प्राध्यापक हे या पदावर राहू इच्छितात की नाही, त्यांची उपलब्धता असणार की नाही हे विचारणे नियमाप्रमाणेच आहे. त्यामुळे पंचाहत्तर वर्षांवरील मानद प्राध्यापकांना ही पत्रे पाठवली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व प्रिन्स्टन विद्यापीठातही मानद प्राध्यापकांना अशी पत्रे पाठवली जातात असा दावा प्रशासनाने केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 12:30 am