ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन ट्रस्टची सूत्रे प्रथमच एका महिलेकडे येत असून त्या पहिल्याच महिला अध्यक्ष असतील, रोना फेअरहेड (वय ५३) या अनेक अग्रगण्य कंपन्यांच्या संचालक मंडळावर कार्यकारी अधिकारी म्हणून होत्या.
त्यांच्या निवडीची प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसली, तरी त्यांच्या नावावर मतैक्य झाले आहे. त्यांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली. ब्रिटनचे सांस्कृतिकमंत्री साजिद जाविद यांनी सांगितले, की श्रीमती रोना फेअरहेड या लॉर्ड पॅटन यांच्या जागी येत आहेत. पॅटन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मे महिन्यात राजीनामा दिला होता. फेअरहेड यांनी सांगितले, की बीबीसी ही अग्रगण्य ब्रिटिश प्रसारण संस्था आहे, या संस्थेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल आपल्याला आनंदच आहे. त्या हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए झाल्या असून काही एचएसबीसी बँक समूहात काम करीत होत्या. ९ सप्टेंबरला त्या संस्कृती, प्रसारमाध्यमे व क्रीडा निवड समितीपुढे उपस्थिती लावणार आहेत.
फेअरहेड या पेप्सिकोच्या संचालक मंडळावर असून त्यांच्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांनी सांगितले, की त्या अनुभवसिद्ध व्यावसायिक अधिकारी आहेत. त्यांना अनेक देशांतील उद्योग क्षेत्रांचा अनुभव आहे. पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी त्यांची नेमणूक उद्योग दूत म्हणून केली आहे. बीबीसीच्या प्रवक्तयाने फेअरहेड यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.