पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीने ११ हजार ३०० कोटींना चुना लावल्याची बातमी ताजी असतानाच रोटोमॅकचे मालक विक्रम ठाकूर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याची बातमी समोर आली. त्यानंतर हा आकडा ८०० ते १ हजार कोटींच्या घरात गेला. मात्र रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम ठाकूर यांनी ३ हजार ६९५ कोटींचा घोटाळा केल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी याने ७ बँकांकडून कर्ज घेतले. मात्र ते परत केलेच नाही त्यामुळे सीबीआयने विक्रम कोठारींच्या तीन ठिकाणांवर छापेमारी केली. रविवारीच विक्रम कोठारीचा घोटाळा समोर आला होता. त्यानंतर आता हा घोटाळा ३ हजार ६९५ कोटींचा असल्याचे समजते आहे.

बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बँकांकडून विक्रम कोठारीने कर्ज उचलले होते. मात्र ते परत करण्यात आले नाही. विक्रम कोठारींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. सीबीआयने या घोटाळ्य़ाशी संबंधित अनेक बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत ज्यावरून या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर आले आहे.

विक्रम कोठारी म्हणाले, मी कोणताही घोटाळा केलेला नाही. मी कर्ज घेतले होते. पण ते मी अजून फेडू शकलेलो नाही. बँकांनी त्याला बुडीत कर्ज म्हटले असून अजून मला डिफॉल्टर जाहीर केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असून मी कर्जाची परतफेड करणारच, असे देखील त्यांनी सांगितले. विक्रम कोठारी हे रविवारी रात्री कानपूरमधील एका लग्नसोहळ्यात देखील उपस्थित होते. त्यामुळे ते अजूनही भारतातच असल्याचे स्पष्ट झाले.

विक्रम कोठारी हे ‘पान पराग’ या पान मसाला कंपनीचे संस्थापक एम एम कोठारी यांचे चिरंजीव आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रम कोठारी यांनी स्टेशनरीचा व्यवसाय सुरु केला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते विक्रम कोठारींना गौरवण्यात आले होते.