इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना करोनाची बाधा झाल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे. शनिवारी एका दिवसात इराणमध्ये २ लाख ७१ हजार ६०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती रुहानी यांनी टीव्हीवर दिली. एवढंच नाही तर इराणमध्ये आणखी साडेतीन कोटी लोक करोना पॉझिटिव्ह होऊ शकतात अशीही धक्कादायक शक्यता त्यांनी बोलून दाखवली. रॉयटर्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

इराणच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात आत्तापर्यंत अडीच कोटी नागरिकाना करोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती रुहानी यांनी त्यांच्या भाषणात दिली. आणखी ३ ते साडेतीन कोटी लोकांना करोनाची लागण होण्याची शक्यता आहे अशीही भीती त्यांनी बोलून दाखवली. सध्याच्या घडीला २ लाख लोक रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत असंही रुहानी यांनी स्पष्ट केलं.

तेहरानमध्ये असलेले निर्बंध एका आठवड्याने वाढवण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, बोर्डिंग स्कूल्स, हॉटेल्स, इनडोअर स्विमिंग पूल्स या सगळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. इराणच्या आरोग्य विभागाने मागील २४ तासात इराणमध्ये १८८ जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. सध्याच्या घडीला इराणमध्ये झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या १३ हजार ९७९ इतकी झाली आहे. इराणची लोकसंख्या ८ कोटी इतकी आहे. इराणच्या मध्यपूर्व भागात करोनाचा प्रभाव जास्त आहे. रविवारपासून २२ शहरांमध्ये तीन दिवसांचा कठोर लॉकडाउन असणार आहे.