जम्मू काश्मीरमधील उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पैशांचा पाऊसच पडला आहे. गुजरातमधील सूरतमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात उपस्थितांनी गायकायवर तब्बल एक कोटी रुपये उधळले आहेत. आता या पैशांचे उरी हल्ल्यातील शहीदांमध्ये वाटप केले जाणार आहे.

उरी हल्ल्यातील शहीदांना मदतीचा ओघ सुरु आहे. देशासाठी बलिदान देणा-या या जवानांना देशभरातून मानवंदनाही दिली जात आहे. सूरतमधील कार्यक्रमातही याचाच अनुभव आला. सूरतमध्ये गुरुवारी उरी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गायकांनी गाण्यांना सुरुवात करताच उपस्थित भारावले. बघता बघता गायकासमोर उपस्थितांची गर्दी वाढली आणि मग सुरु झाली पैशांची उधळण. अगदी १० रुपयांपासून ते थेट हजार रुपयांपर्यंतच्या नोटा या गायकावर उधळल्या जात होत्या. यात पुरुषच नव्हे तर महिलाही आघाडीवर होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी हे पैसे गोळा करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे एक कोटी रुपये जमा झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
आम्ही उरी हल्ल्यातील शहीदांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता हे पैसे आम्ही शहीदांच्या कुटुंबांमध्ये समान वाटून देणार आहोत असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. १९ सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांनी उरीतील लष्करी छावणीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते.