करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. नागरिकांना या काळात विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात आलेली आहे. या काळात पोलिस, वैद्यकीय यंत्रणा जिवावर उदार होऊन काम करत आहेत. याचसोबत देशभरातील पत्रकारही या काळात वार्तांकनासाठी घराबाहेर पडतात. मुंबईत काही टिव्ही पत्रकार व कॅमेरामनला करोनी लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सध्याच्या खडतर परिस्थितीत हरियाणातील मनोहरलाल खट्टर सरकारने सर्व पत्रकारांना १० लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. ANI वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

करोनाचं वार्तांकन करताना अनेकदा पत्रकार ज्या भागात करोनाचा जास्त प्रादूर्भाव आहे अशा ठिकाणी जात असतात. मुंबई, चेन्नईत काही पत्रकारांना करोनाची लागण झाल्यानंतर खट्टर सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील पत्रकारांची करोना चाचणी होईल असं जाहीर केलं आहे. दिल्लीसोबत कर्नाटक सरकारनेही पत्रकारांना करोना चाचणी करुन घेण्याचे आदेश दिले आहेत.

अवश्य वाचा – राष्ट्रपतींच्या पत्नीचाही करोनाविरुद्ध लढ्यात सहभाग, शेल्टर होमसाठी शिवतायत मास्क

बुधवारी केंद्र सरकारनेही पत्रकारांना करोनाचं वार्तांकन करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. अत्यावश्यक सेवेखाली प्रिंट आणि इलेक्ट्रॉनीक माध्यमांचे प्रतिनिधी देशभरात वार्तांकनासाठी फिरत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने घेतलेल्या निर्यणाचं स्वागत केलं जातंय.