नरेंद्र मोदींवर १०० कोटींचे बक्षीस
इस्लामाबाद : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सलाउद्दीन याच्या अटकेसाठी भारताने प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संसदेचे सदस्य जमात-ए-इस्लामीचे प्रमुख सिराज उल हक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पकडून पाकिस्तानात आणण्यासाठी १०० कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्याची आगळीक केली आहे.

गिलगिटमधील घुसखोरीबद्दल भारताची टीका
नवी दिल्ली : काश्मीरमधील गिलगिट व बाल्तिस्तान प्रांत भारताचे अविभाज्य घटक असतानाही येत्या ८ जून रोजी तेथे निवडणुका जाहीर करून पाकिस्तानने जबरदस्तीने बेकायदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका भारताने मंगळवारी केली. भारताचे परराष्ट्र प्रवक्ते विकास स्वरूप यांनी यासंबंधी पाकिस्तानवर अत्यंत तीव्र टीका केली.
गिलगिट व बाल्तिस्तान भागावर अतिक्रमण करून तेथील नागरिकांचे राजकीय अधिकार नाकारण्याचा पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आरोप विकास स्वरूप यांनी केला.

‘चर्चेसाठी भारताच्या अटी दुर्दैवी’
इस्लामाबाद : बोलणी सुरू करण्यासाठी भारताने अटी घालणे दुर्दैवी असल्याची टीका पाकिस्तानने मंगळवारी केली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रीय व्यवहार सल्लागार सरताझ अझीझ यांनी यासंबंधी स्पष्ट प्रतिक्रिया नोंदविली.
निंयत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतव्याप्त काश्मीर परिसरात भारत तेथील असहाय्य जनतेच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करीत असतानाच पाकिस्तानने मात्र हिंसाचारमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा भारताकडून केली जाते, हे दुर्दैवी आहे, असे अझीझ यांनी स्पष्ट केले.
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तीन अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये दहशतवाद व हिंसाचारमुक्त वातावरण पाकिस्तानने निर्माण करणे आवश्यक आहे. याखेरीज मुंबई हल्लाप्रकरणी मुख्य आरोपी एलईटीचा कमाण्डर झाकी उर रेहमान लख्वी याच्यावर कारवाई करण्याची मागणीही स्वराज यांनी केली होती.