पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करण्याच्या मास्टरस्ट्रोकमुळे देशातील तब्बल ३ लाख कोटींचा काळा पैसा नष्ट होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी हा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार, बेहिशेबी संपत्ती उघड होण्याच्या भीतीने अनेकजण त्यांच्याकडे असलेल्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बँकेत जमा करणे टाळतील. अर्थव्यवस्थेत असलेल्या ५०० आणि १००० रूपयांच्या एकुण नोटांच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के इतके आहे. मात्र, कारवाईच्या भीतीने या नोटा बँकेत जमा न केल्यामुळे मुदत संपल्यानंतर त्या निरूपयोगी ठरणार आहेत. २० टक्के इतके प्रमाण गृहीत धरल्यास देशातील तब्बल तीन लाख कोटींचा काळा पैसा नष्ट होईल, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. यामुळे सावकारी, गृहनिर्माण क्षेत्र, दागिने आणि अशाचप्रकारच्या संशयास्पद व्यवहारांमध्ये गुंतलेल्या बँकावर परिणाम होणार असल्याचे टाटा अॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी रितेश जैन यांनी सांगितले. तर दुसरीकडे यामुळे करव्यवस्थेत पारदर्शकता येणार असून सार्वजनिक वित्तपुरवठा वाढेल, असेही जैन यांनी म्हटले.

५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल, हा आक्षेपही चुकीचा आहे. ग्रामीण भागात अजूनही बरेच व्यवहार रोखीने होतात. याशिवाय, ग्रामीण जनतेचा ओढा घरगुती वस्तू आणि वाहने खरेदी करण्याकडे असतो. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे हे प्रमाण कमी होऊन ग्रामीण जनता सोने आणि मालमत्तेत अशा ठोस स्वरूपांत अधिक गुंतवणूक करेल, असा विश्वास मॉर्गन स्टॅनले रिसर्चच्या चेतन अहया यांनी व्यक्त केला.

घरातील पाचशे, हजाराच्या नोटांच्या बंडलांना आता किंमतच राहिली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेमुळे स्पष्ट होताच रोकड बाळगणारे छोटे-मोठे व्यावसायिक, राजकीय नेते, कार्यकर्ते यांची धाबी दणाणली आणि लेखापालांचे (सीए) मोबाइल खणखणू लागले. लपवलेला काळा पैसा पांढरा करण्याच्या उपायांची शोधाशोध सुरू झाली. अनधिकृत पैसे अधिकृत करून देणाऱ्या दलालांचेही भाव वधारले. सकाळी रुपयामागे असलेली १५ पैसे दलाली दुपारनंतर रुपयामागे साधारण ४० पैशांपर्यंत पोहोचली. कुठेही न गुंतवता रोखीने काळे पैसे बाळगणाऱ्या अनेकांचा बुधवार धावपळीचा होता. आडमार्गाने सोने खरेदी करता येईल का यांपासून अनेक उपायांची चाचपणी करण्यासाठी लेखापालांकडे विचारणा होत होती. अगदी मध्यम स्तरातील हॉटेल व्यावसायिक, जमिनीचे व्यवहार करणारे दलाल, छोटे बांधकाम व्यावसायिक त्यांच्याकडील रकमांचे हिशोब जमवण्यात गुंतले होते. पैसे घेऊन ते टक्केवारीनुसार अधिकृत करून देणाऱ्या दलालांचा ‘भाव’ वधारल्याचीही चर्चा बाजारपेठांमध्ये रंगली होती. साधारण ४० टक्के दलाली घेऊन काही प्रमाणात रक्कम पांढरी करून देण्याचे वायदे केले जात होते.

घरातील किंवा ओळखीतील महिलांचे बँकेचे खाते असल्यास त्यात पैसे जमा करणे, दुसऱ्या कुणाला बक्षीस दिल्याचे दाखवून काही रक्कम परत मिळवणे, स्वयंसेवी संस्थांना देणग्या दिल्याचे दाखवून पूर्वीच्या तारखांनी पावत्या तयार करणे, देवस्थाने किंवा त्या स्वरूपातील ट्रस्टकडून पैसे बदलून घेण्यासाठी प्रयत्न करणे असे काही पर्याय या नागरिकांकडून वापरले जाऊ शकतात. सराफांनीही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवली होती. त्यामुळे काही प्रमाणात सोन्यातही पैसे गुंतवून ते अधिकृत व्यवहार दाखवण्याकडे अनेकांचा भर होता. मात्र या पर्यायांचा देखील उपयोग होणार का, याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे.