येथील विज्ञान भवनाच्या पुष्पसजावटीवर गेल्या दोन वर्षांत २.२९ कोटी रूपये खर्च झाले आहेत. अनेक मंत्रालयांचे कार्यक्रम येथे होतात, त्या वेळी हा खर्च झाला आहे, असे माहिती अधिकारातील अर्जावर मिळालेल्या उत्तरात उघड झाले आहे.
विज्ञान भवन हे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालवले जाते. तेथे सजावटीवर २०१२-१३ मध्ये १,१८,४१,४८० रूपये, २०१३-१४ मध्ये १,११,४९, ५५० रूपये खर्च झाले आहेत.
फुलांवरचा रोजचा खर्च हा २०१२-१३ मध्ये ३२४४० रूपये, तर २०१३-१४ मध्ये ३०,५४० रूपये होता. गुरगावच्या एका रहिवाशाने माहिती अधिकारात ही माहिती मागितली होती. त्यात विज्ञान भवनने म्हटले आहे की,  अधिकृत कार्यक्रम व इतर कार्यक्रमात फुलांचा वापर केला जातो. मे. नीलम फ्लोरिस्ट व मे. संजय फ्लोरिस्ट हे विज्ञान भवनाचे पुष्पसजावटीचे काम बघतात. सजावटीचा खर्च संबंधित मंत्रालय किंवा विभाग करीत असतो.  पुष्पसजावट ही गरजेनुसार व ग्राहक विभागानुसार असते. मंत्रालये व विभाग पुष्पसजावट कशी पाहिजे ते सांगतात व त्यासाठी खर्चाचा  धनादेश देतात. विज्ञान भवन १९५६ मध्ये बांधण्यात आले असून राष्ट्रीय पातळीवरचे कार्यक्रम तेथे होतात. अनेकदा पंतप्रधान, राष्ट्रपती या कार्यक्रमांना येतात. राष्ट्रीय परिषदा व राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण याच ठिकाणी होत असते.