पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी ४१ परदेश दौरे केले असून या दौऱ्यांवर ३५५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. माहिती अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली असून गेल्या चार वर्षांमध्ये मोदी एकूण १६५ दिवस परदेशात होते.

बेंगळुरुतील माहिती अधिकार कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे, त्यावर होणारा खर्च याबाबतची माहिती मागवली होती. पंतप्रधान कार्यालयाने यावर उत्तर दिले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये मोदींनी ४१ परदेश दौरे केले. यात त्यांनी ५० देशांना भेटी दिल्या. या दौऱ्यांसाठी एकूण ३५५ कोटी रुपये खर्च झाले.

नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौरा हा सर्वात महागडा ठरला. मोदींच्या फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या दौऱ्यासाठी ३१ कोटी २५ लाख रुपये खर्च आला. तर भूतान दौऱ्यांवर सर्वात कमी खर्च झाला. मोदींच्या भूतान दौऱ्यावर २ कोटी ४५ लाख रुपये खर्च झाला.

मोदींच्या परदेश दौऱ्यांवर चार वर्षांत ३५५ कोटी रुपये खर्च झाले असतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्यांवर ६४२ कोटी रुपये खर्च झाले होते. सिंग यांच्या सुमारे १०वर्षांच्या, २००४ ते २०१३ या कालावधीत हा खर्च झाला होता. सिंग यांनी या कालावधीत ६७ परदेश दौरे केले होते. तर मोदींनी गेल्या चार वर्षांत ४१ परदेश दौरे केले आहेत.