सर्वसामान्य जनतेला चलन तुटवड्याचा फटका बसत असला तरी काही मंडळींकडे नवीन नोटा मोठ्या प्रमाणात आढळत आहे. मध्यप्रदेशमध्ये ‘भ्रष्टाचार विरोधी समिती’च्या अध्यक्षाच्या गाडीत ४० लाख रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचाही समावेश असून ही कार नेमकी कोणाची आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मध्यप्रदेशमधील होशंगाबादमध्ये पांढ-या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये पोलिसांना ४० लाख रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचाही समावेश आहे. या इनोव्हा गाडीच्या नंबरप्लेटजवळ सोनेरी अक्षरात ‘भ्रष्टाचारविरोधी समिती अध्यक्ष’ असे लिहिले आहे. त्यामुळे या नोटा नेमक्या कोण्याच्या आणि या गाडीचे मालक कोण याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेश पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करुन गुरुवारी एक महिना पूर्ण झाला आहे. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्याने चलन तुटवडा निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र एकीकडे सर्वसामान्यांना बँकेतून पैसे काढताना असंख्य अडचणी येत असताना या मंडळींकडे ऐवढ्या प्रमाणात नोटा कुठून येत आहेत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  गुरुवारी चेन्नईमध्येही आयकर विभागाने आठ सराफा व्यावसायिकांच्या घर आणि दुकानांवर छापा घातला होता. त्यांच्याकडून ९० कोटी रुपये रोख आणि १०० किलो सोने जप्त करण्यात आले होते. या सराफांकडेही ७० कोटी रुपयांच्या नवीन नोटा आढळल्या होत्या.