देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस करण्याचा विडा उचललेल्या मोदी सरकारने आता घरगुती सिलिंडरच्या (एलपीजी) ऑनलाइन पेमेंटवर पाच रूपयांची सूट जाहीर केली आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाइन व्यवहारांसाठीही अशाचप्रकारची सूट देण्यात आली होती. त्यानंतर आता तेल कंपन्यांकडून प्रत्येक घरगुती सिलिंडरची खरेदी आणि पैसे ऑनलाइन भरल्यास पाच रूपयांची सूट जाहीर करण्यात आली. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना ०.७५ टक्के सूट देण्याचे आदेश सरकारने तेल कंपन्यांना दिले होते. त्यामध्ये आता एलपीजीची भर पडली आहे. सिलिंडरची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्डाचा पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाइन व्यवहार करताना ग्राहकांना किती सूट मिळाली, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

मागील महिन्यात केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) दरात २ रुपये ७ पैशांची वाढ जाहीर करण्यात आली होती. तसेच विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाचे दर ३.७ टक्क्यांनी कमी करण्यात आले होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारकडून डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘भीम’ या मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले होते. ‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे या अ‍ॅपचे खरे नाव. पण त्यावरून ‘भीम’ असे राजकीयदृष्टय़ा सूचक असणारे नामाभिधान मोदींनी केले आणि प्रतिष्ठेच्या केलेल्या ‘लेस कॅश’ मोहिमेला थेट राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी मोदींनी बाबासाहेबांच्या आर्थिक क्षेत्रातील कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थापनेमधील आंबेडकरांच्या योगदानाकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.