28 October 2020

News Flash

करोनाचे अचूक निदान पाचशे रुपयांत!

देशात ‘फेलुदा’ चाचणीस औषध महानियंत्रकांची परवानगी

प्रतिकात्मक छायाचित्र

देशात ‘फेलुदा’ चाचणीस औषध महानियंत्रकांची परवानगी

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या संसर्गावरील ‘फेलुदा’ चाचणीस भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे.  टाटा समूह आणि ‘सीएसआयआर’च्या रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थांनी  या चाचणीसाठी लागणारी साधने व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध केली आहेत. ही चाचणी अवघ्या पाचशे रुपयांत होईल.

या चाचणीत क्रिस्पर म्हणजे ‘क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेसड शॉर्ट पॅलिनड्रोमिक रिपीटस’ तंत्राचा अवलंब केला आहे. हे जनुकीय संपादन तंत्रज्ञान असून त्याच्या मदतीने रोगांचे निदान करता येते. प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक व लेखक सत्यजित राय यांच्या कादंबऱ्यांतील फेलुदा या गुप्तहेर पात्राचे नाव या चाचणीस देण्यात आले आहे. फेलुदा चाचणीची अचूकता आरटी-पीसीआर इतकी आहे. आरटी पीसीआर चाचणीला ४५०० रुपये खर्च येतो, तर फेलुदा चाचणीला केवळ पाचशे रुपये लागतात. औषध महानियंत्रक समितीने या चाचणीला मान्यता दिली आहे.  सीएसआयआरच्या निवेदनात म्हटले आहे की, ही चाचणी ९६ टक्के संवेदनशील व ९८ टक्के विशिष्टता दाखवणारी आहे. करोना विषाणूचा शोध घेण्यासाठी यात ‘कॅस ९’ प्रथिनांचा यशस्वी वापर करण्यात आला असून टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स लि.चे गिरीश कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, टाटा क्रिस्पर चाचणीला मान्यता मिळाली असून आता कोविड १९ विरोधातील लढा अधिक तीव्र करता येईल. सीएसआयआरच्या  आयजीआयबी या संस्थेचे संचालक अनुराग अगरवाल यांनी सांगितले की, सिकल सेल रोगावरील जनुकीय निदानात याचा वापर केला जात होता. आता ही चाचणी कोविडसाठी विकसित केली आहे. यात संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सौविक मैती व डॉ. देबज्योती चक्रबर्ती यांचा मोठा वाटा आहे.

‘फेलुदा  या कोविड निदान चाचणीत गर्भधारणा ओळखण्यासाठी जशी पट्टी अलीकडे वापरतात तशी पट्टी वापरली जाते ही चाचणी करण्यास कुठलीही कौशल्ये लागत नाहीत. यंत्रे लागत नाहीत. शिवाय या चाचणीची अचूकता आरटी-पीसीआर इतकीच म्हणजे १०० टक्के आहे.’

 – शेखर मांडे, महासंचालक, औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 2:49 am

Web Title: rs 500 feluda test for covid 19 approved by india zws 70
Next Stories
1 लडाख सीमेवरील सहा प्रमुख शिखरांवर भारताचा ताबा
2 दिवसभरात ९४,६१२ करोनामुक्त
3 आमसभा अधिवेशनापूर्वीच इराणवर निर्बंध
Just Now!
X