देशभरात लागू झालेली एक कर प्रणाली अर्थात ‘जीएसटी’ मुळे एका महिन्यांत ९२ हजार २८३ कोटी रुपयांचा एकूण महसूल जमा झाला आहे. एकूण करदात्यांकडून जमा झालेला हा महसूल ६४.४ टक्के इतका आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.


देशातील नव्या करप्रणालीतून सरकारी तिजोरीत जमा झालेल्या महसूलाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जेटली बोलत होते. जुलै महिन्यांत ९२ हजार २३८ कोटींचा महसुल सरकारला मिळाला आहे. यामध्ये १४ हजार ८९४ कोटी रुपये हे केंद्राच्या करातून मिळाले आहेत. तर २२ हजार ७२२ कोटी रुपये हे राज्यांच्या करातून मिळाले आहेत. तसेच एकात्मिक करातून ४७ हजार ४६९ कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे. त्याचबरोबर ७ हजार १९८ कोटी रुपयांचा महसूल हा भरपाई उपकरातून मिळाला आहे,  असे जेटलींनी सांगितले.

जेटली म्हणाले, ७.२३ दशलक्ष करदाते यापूर्वीच जीएसटीमध्ये परावर्तीत झाले आहेत. यांपैकी ५८.५३ लाख करदात्यांनी आपली जीएसटी रिटर्न्स भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, उशीरा जीएसटीमध्ये समाविष्ट झालेल्यांकडून विलंब दंड आकारण्यात आला आहे. त्यासाठी केंद्रिय आणि राज्य जीएसटीसाठी १०० रुपये प्रतिदिन या प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या महिन्याचे अर्थात जुलै महिन्यासाठी टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत २५ ऑगस्ट रोजीच संपली आहे. या करांमध्ये राज्ये आणि केंद्राचे विविध कर जसे जकात, सेवा आणि व्हॅट रद्द होऊन एकच ‘जीएसटी’ भरावा लागला आहे. मात्र, व्यावसायिकांना २८ ऑगस्टपर्यंत रिटर्न भरण्याची मुदत देण्यात आली होती. देशात १ जुलैपासून ‘जीएसटी’ करप्रणाली लागू करण्यात आली आहे.