राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह त्यांच्या संलग्न १९ संघटनांची माहिती तपासण्याचे काम बिहारच्या नितीशकुमार सरकारकडून राज्यातील पोलिसांवर सोपवण्यात आले आहे. राज्य पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला हे आदेश देण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांच्या विशेष शाखेद्वारे २८ मे रोजी एका पत्राद्वारे विशेष शाखेच्या सर्व पोलीस उप अधीक्षकांना ही माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याबाबतचे एक पत्र नुकतेच समोर आले आहे, नवभारत टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीआधी दोन दिवसांपूर्वी हे पत्र पाठवण्यात आले होते.

या पत्रानुसार संघासह १९ हिंदूत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे. या माहितीचा अहवाल पोलीस मुख्यालयाला पाठवण्यात आला आहे की नाही याची माहिती कळू शकलेली नाही. मात्र, हे पत्र समोर आल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ सुरु असल्याचे उघड झाले आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे कारण, रा. स्व. संघ ही एक राष्ट्रीय संघटना असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांच्या विशेष शाखेकडून काढण्यात आलेल्या या पत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागरण समिती, धर्मजागरण समन्वय समिती, मुस्लिम राष्ट्रीय मंच, हिंदू राष्ट्र सेना, राष्ट्रीय सेविका समिती, शिक्षा भारती, दुर्गा वाहिनी, स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, भारतीय रेल्वे संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय शिक्षक महासंघ, हिंदू महासभा, हिंदू युवा वाहिनी, हिंदू पुत्र संगठन या संघाशी संलग्न असलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची नावे, पत्ते, फोन क्रमांक आणि त्यांच्या व्यावसायाबाबत माहिती मागण्यात आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी ही नेहमीची बाब असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक राज्यातील आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर खात्याकडून वेळोवेळी अशा प्रकारे तपासणी घेतली जाते. त्यामुळे कोणत्याही संघटनेची प्रतिमा खराब करण्याचा याचा हेतू नाही, असे त्यांनी म्हटले आहे.