राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शबरीमलामध्ये गोंधळाचे वातावरण का निर्माण करीत आहे? त्यांचं हे वागणं तालिबानी आणि खलिस्तानवाद्यासारखं आहे. खरंतरं त्यांनी सर्वांना शांतेत दर्शन घेण्यास सहकार्य करायला हवं, मात्र ते हे करीत नाहीत, असा घणाघाती आरोप सीपीआयएमच्या पॉलिटब्युरोचे सदस्य एस. रामचंद्रन पिल्लई यांनी केला आहे.


केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश न देण्यावरुन सध्या रणकंदन माजले आहे. गेल्या काही दिवसांपासून इथलं वातावरण ढवळून निघालं आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार इथं मंदिर प्रवेशासाठी महिला कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. तर परंपरांचं कारण देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संलग्न हिंदूत्ववादी संघटना तसेच भाजपा येथे महिलांना प्रवेश रोखण्यावर ठाम आहेत.

दोन्ही बाजूंकडील लोक आपापल्या मतांवर ठाम असल्याने हा संघर्ष सध्या टिपेला पोहोचला आहे. महिलांना प्रवेश नको म्हणणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांसह स्थानिकांनी येथे आंदोलने केली आहेत. दरम्यान, काही ठिकाणी हिंसाचारही झाला आहे. तर केरळच्या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करताना महिला कार्यकर्त्यांना मंदिर प्रवेशासाठी संरक्षण पुरवले आहे. त्यावरुनही भाजपा आणि सरकारमध्ये जुंपली आहे. येथील सरकार हे डाव्यांचे असल्याने राजकीय वैमन्यस्यातून भाजपाकडून हे प्रकरण चिघळवले जात असल्याचा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर एस. रामचंद्रन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तालिबानी आणि खलिस्तानवाद्यांप्रमाणे कृती करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.