आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नरेंद्र मोदी यांची प्रचारप्रमुखपदी नियुक्ती केल्याने नाराज झालेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे बंड अवघ्या २४ तासांत शमले. पक्षाच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी अप्रत्यक्षपणे बंडाचा झेंडा रोवणारे अडवाणी यांचे रा. स्व. संघाने बौद्धिक घेतल्यानंतर त्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. मोदी यांना प्रचारप्रमुखपद नियुक्त करण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत बदलण्यात येणार नाही, असे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. अडवाणी यांच्या या निर्णयाचे मोदी यांनी स्वागत केले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचारप्रमुखपदी नियुक्ती होण्याची चिन्हे दिसताच पणजीच्या अधिवेशनकाळातच अचानक ‘आजारी’ पडलेल्या अडवाणी यांनी सोमवारी पक्षाच्या तिन्ही प्रमुख समित्यांच्या प्रमुखपदाचा राजीनामा राजनाथ यांच्याकडे सोपविला. यानंतर भाजपच्या सर्व नेतेमंडळींनी सोमवारी त्यांचे मन वळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु तरीही अडवाणी बधत नसल्याचे बघून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी याप्रकरणी निर्वाणीचा हस्तक्षेप करून अडवाणी यांना मंगळवारी अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले.
‘भाजपच्या संसदीय मंडळाने घेतलेल्या निर्णयाचा आदर करा आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन पक्षाला यापुढेही मार्गदर्शन करा,’ या शब्दांत भागवत यांनी अडवाणी यांना कानपिचक्या दिल्या. भागवत यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर  अडवाणी यांनी आपला राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेले दोन दिवस पक्षांतर्गत सुरू असलेला पेचप्रसंग तूर्तास तरी संपल्याचे मानले जात आहे.
‘अडवाणी यांनी भागवत यांचा सल्ला मानण्याचे ठरविले असून राष्ट्रीय हित लक्षात घेऊन पक्षाला मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे,’ असे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले. त्याआधी राजनाथ सिंह यांच्यासह सुषमा स्वराज, नितीन गडकरी, आदी नेत्यांनी अडवाणी यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.
राजनाथ सिंह यांनी अडवाणी यांच्याच निवासस्थानी नंतर घोषणा केली परंतु त्या वेळी अडवाणी यांची अनुपस्थिती बोलकी ठरली होती. असे का घडले, असे विचारले असता, ‘माझ्या पत्रकार परिषदेत तुम्ही बसावे आणि मी त्या वेळी बोलावे हे काही ठीक दिसले नसते, असे आपण अडवाणी यांना सांगितले,’ अशी सारवासारवा राजनाथ सिंह यांनी केली.

प्रचारप्रमुखपदी मोदीच..
लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी यांच्या पक्षप्रमुखपदाच्या ज्या निर्णयावरून पक्षाविरोधात बंडाचा झेंडा उभारला, तो निर्णय कदापिही रद्द केला जाणार नाही, असे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.