राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शमशान-कब्रस्तान राजकारणावर टिका केली असून समाजाच्या भल्यासाठी याचा उपयोग नसून केवळ सत्ता मिळवण्यासाठी असं राजकारण केलं जातं असे उद्गार काढले आहेत. भागवतांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीमधल्या कार्यक्रमात बोलताना हा दाखला दिला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शमशान कब्रस्तान हे शब्द उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान गेल्या वर्षी वापरले होते. भागवतांच्या या खुलाशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून हा नरेंद्र मोदींना इशारा आहे का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ध्रुवीकरणाचे राजकारण या संदर्भात भागवतांना प्रश्न विचारण्यात आला होता. आरएसएसच्या दृष्टीकोनातून भारताचे भवितव्य या तीन दिवसीय परिसंवादादरम्यान ही चर्चा घडली. लोकांच्या भल्यासाठी राजकारण असावं आणि त्यासाठीचं माध्यम म्हणजे सत्ता आहे असं भागवत म्हणाले. “जयप्रकाश नारायण व महात्मा गांधींची हीच अपेक्षा होती. तसं झालं तर हा प्रश्नच निर्माण होणार नाही. शमशान, कब्रस्तान, भगवा दहशतवाद आणि हे सगळे प्रश्नच निर्माण होणार नाहीत,” हे प्रश्न समोर येतात कारण राजकारणाचा उपयोग सत्तेसाठी केला जातो, लोकांच्या भल्यासाठी नाही असे भागवत म्हणाले.

फेब्रुवारी २०१७ मध्ये अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेशातल्या सरकारवर भेदभावाच्या वागणुकीची टिका करताना मोदी म्हणाले होते की, तुम्ही जर गावामध्ये कब्रस्तान बांधलंत तर स्मशानही बांधायला हवंत. जर रमझानसाठी विनाखंडित वीजपुरवठा दिलात तर तसाच विनाखंडित वीजपुरवठा दिवाळीतही व्हायला हवा. यामध्ये भेदभाव असता कामा नये.” त्यामुळे भागवतांचं विधान उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांमध्ये करण्यात आलेल्या राजकारणासंदर्भात आहे हे उघड आहे. येत्या काळामध्ये मध्यप्रदेश व राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तर पुढच्या वर्षी लोकसभेच्या व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर भागवतांचे उद्गार हा मोदींसाठी इशारा आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या निवडणुका भाजपानं प्रचंड जागा घेत जिंकल्या व बहुमताचं सरकार स्थापन केलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजकारण, सत्तेचा उपयोग आदींबाबत भाष्य करताना कब्रस्तान व शमशान याचा उल्लेख करणं त्यामुळेच वैशिष्ट्यपूर्ण मानण्यात येत आहे. आरएसएस ही भाजपाची पितृसंस्था मानण्यात येते, त्याचप्रमाणे भाजपावर संघाचं अदृष्य नियंत्रण असल्याचंही मानण्यात येतं. भागवतांच्या या विधानावर काय प्रतिक्रिया येतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagawats reference to kabrastan shamshan comment message to modi
First published on: 20-09-2018 at 13:45 IST