राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मोदी सरकार लवकरच ‘झेड प्लस’ सुरक्षा कवच प्रदान करणार आहे. सुरक्षेच्या वर्गवारीतील अशा प्रकारची अव्वल दर्जाची सुरक्षा व्यवस्था सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिली गेली आहे. सीआयएसएफच्या जवानांचे पथक भागवत यांच्या सुरक्षा ताफ्यात असेल यात ६० कमांडोंचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रासह देशभरात ज्या ज्या ठिकाणी भागवत जातील त्याठिकाणी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमण्यात आलेल्या सीआयएसएफच्या पथकावर असणार आहे. अशाप्रकारची सुरक्षा व्यवस्था पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या व्यतिरिक्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही दिली गेली आहे. सध्या महाराष्ट्र पोलीस आणि राज्य राखीव पोलिस दल संघ मुख्यालय आणि भागवत यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळून आहे. लवकरच ही जबाबदारी आता सीआयएसएफचे पथक स्विकारणार आहे. मोहन भागवत हे दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर असल्याने त्यांना झेड-प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 4:34 am